भारतातील प्रत्येक खेड्यापाड्यात व घराघरात परिचित असलेला शालीन चेहरा कोणाचा असा प्रश्न केल्यास, त्याचं
एकमेव उत्तर येईल ते म्हणजे इंदिरा गांधी. आपल्या कर्तृत्वाने इंदिराजी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. या पदावर काम करताना त्यांनी आंतरराष्ट्रीय राजकारणावरही प्रभाव पाडला. पाकिस्तानशी झालेले 1971 चे युद्ध, स्वतंत्र बांगला देशाची निर्मिती, अलिप्त राष्ट्रांच्या प्रमुख म्हणून त्यांची कणखर भूमिका, सुवर्णमंदिरात लपलेल्या खलिस्तानी अतिरेक्यांचा खात्मा करण्यासाठी ऑपरेशन ब्ल्यू स्टार ही लष्करी कारवाई या काही त्यांच्या जीवनातील महत्वपूर्ण घटना. 31 ऑक्टोबर हा इंदिराजींचा पुण्यतिथी दिन 'राष्ट्रीय संकल्प दिवस' म्हणून पाळला जातो. त्यानिमित्त इंदिराजींच्या जीवन कार्याची ही थोडक्यात माहिती......
स्वातंत्र्याची उत्कंठा
आपला देश ब्रिटिशांच्या हुकूमतीतून मुक्त व्हावा याची आस इंदिराजींना फार लहान असल्यापासून होती. लहानपणापासूनच स्वातंत्र्य संग्राम अगदी जवळून पाहिल्यामुळे देशभक्तीची भावना त्यांच्या हृदयात भिनली होती. लाहोर काँग्रेसच्या अधिवेशनात त्या आजोबा मोतीलाल व वडील जवाहरलाल यांच्या समवेत होत्या. खरं म्हणजे नेहरु घराण्याला देशभक्तीचा एक समृद्ध वारसाच लाभला होता. इंदिराजींचे पती फिरोज गांधी यांचेदेखील स्वातंत्र्य संग्रामात मोलाचं योगदान होतं. ते एक सच्चे व निष्ठावान देशभक्त होते. मुंबईच्या ग्वालियर टँक येथे भरलेल्या अखिल भारतीय काँग्रेसच्या अधिवेशनात 8 ऑगस्ट 1942 रोजी महात्मा गांधींनी ब्रिटीश राज्यकर्त्यांना 'चलेजाव'चे फर्मान बजावल्यावर इंदिराजींनी स्वत:ला सत्याग्रहात झोकून दिलं.
देश स्वयंसिद्ध असावा
देश स्वतंत्र झाल्यानंतर त्या नेहरूंची सावली म्हणूनच वावरत होत्या. पुढे पंतप्रधानपदही त्यांना मिळाले. अनेकांना ते वारशात मिळाले असे वाटले. पण हे पद त्यांना त्यांच्या कर्तृत्वाच्या जोरावर मिळाले हे त्यांनी नंतर सिद्ध करून दाखवले. जगातील महाशक्तींवर विसंबून न राहता, आपण प्रत्येक क्षेत्रात स्वयंसिद्ध असावयास पाहिजे, ही इंदिराजींची ठाम भूमिका होती. त्या पंतप्रधानपदी असताना 18 मे 1974 रोजी राजस्थानच्या वाळवंटातील पोखरण येथे अणुशक्ती मंडळामार्फत अणुस्फोटाची भूमिगत चाचणी त्यांनी यशस्वी करुन दाखविली.
कुठल्याही परकीय आक्रमणास समर्थपणे सामोरे जाण्यासाठी स्वयंसिद्ध असणे, हे त्यांचं धोरण होतं. आण्विक शक्तीचा उपयोग रचनात्मक कार्यासाठी केला जाईल, हा संदेश त्यांनी जगाला दिला. यासंदर्भात लोकसभेत स्पष्टीकरण करताना त्या म्हणाल्या, 'कोणतंही तंत्रज्ञान दुष्ट नसतं, तर राष्ट्र त्याचा कसा वापर करते, यावर ते अवलंबून असतं.' आधुनिक तंत्रज्ञानचा अंगिकार करुन भारत हा कोणत्याही बाबतीत मागे नाही, हे त्यांनी जगाला दाखवून दिलं आणि हिंदुस्थानाला जगाच्या नकाशावर मानाचं स्थान मिळवून दिलं.
अतिथी देवो भव
महात्मा गांधी, आजोबा मोतीलाल, पिता जवाहरलाल तसेच आई कमला नेहरु यांच्या आज्ञा त्या शिरसावंद्य मानीत. वडीलधार्यांचा आदर, सन्मान करणे हे संस्कार त्यांच्यावर लहानपणीच रुजवले गेले होते. त्यामुळे त्यांच्या मनात वडीलधार्यांविषयी निस्सिम प्रेम व आदर असे. आदरातिथ्याबाबत तर इंदिराजी नेहमी सर्वांच्या पुढे असत. पंडीत नेहरुंबरोबर त्यांनी देश-विदेशात भ्रमण केल्याने त्या त्या देशातील लोकांच्या आवडीनिवडीविषयी इंदिराजींना पुरेपूर माहिती होती. म्हणूनच भोजनाचा मेनू त्या स्वत:च तयार करीत असत. आपल्याकडे स्नेहभोजनास बोलावण्यात आलेली मंडळी ती भारतीय असो व परदेशी त्यांची नीट खातिरदारी करणे, हे त्यांच्या स्वभावातील गुणवैशिष्टय होतं.
निसर्गाशी समरस
इंदिराजींची राजकारणाव्यतिरिक्त अन्य विषयातील अभिरुची पाहून कोणालाही आश्चर्य वाटत असे. त्यांना झाडं, फुलं, अरण्य, वन्य प्राणीजीवन, डोंगर-दर्या आणि पर्यावरण यात राजकारणाइतकाच रस होता. आपल्या निवासस्थानी असलेल्या बागेची त्या नित्यनियमाने मशागत करीत असत. इतकेच नव्हे तर, त्या स्वत: मोठ्या हौसेने रंगीबेरंगी फुलांची झाडं लावत असत. हा त्यांचा दैनंदिन कामकाजातील एक मुख्य भाग होता. निसर्गाशी समरस होऊन फुलझाडं लावणं व त्याची देखभाल करणे, हा त्यांचा छंद होता. हेच त्यांच्या निसर्गप्रेमाचं प्रतीक होतं.